Tuesday, April 23, 2013

भूमिका


           एका पुस्तकात वाचलं होतं एकदा … दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य होतं … पक्कं लक्षात राहिलंय ते माझ्या ! "मी असं असं वागतो कारण माझ्या आतून कुठलीतरी एक शक्ती मला तसं वागायला प्रेरित करत असते. बघताना त्याचे परिणाम वाईट दिसत असतील . पण वागताना मी चुकीचं वाईट , दुष्ट म्हणून कधीच वागत नसतो. " 

          'मला' वाटणाऱ्या भावनेशी प्रामाणिक राहणंच झालं ना हे !

          लहानपणापासून शिकवलं जातं… हे 'असं' वागणं म्हणजे 'चूक'… हे 'असं' वागणं म्हणजे 'बरोबर'… हे योग्य… हे अयोग्य… ! आणि आपण तसं-तसं  वागत जातो… चूक-बरोबर , योग्य-अयोग्य या व्याख्याच मुळात खूप सापेक्ष ! 'कोणाच्या दृष्टीने?' हा प्रश्न उरतोच न ! शिवाय या दोन टोकाच्या भूमिकांच्या मध्ये याच दोघांच्या असंख्य shades असतीलच ना ! त्या कधीच कोणी दाखवत नाही… 

          एखादी व्यक्ती रडते आणि तिला सहानुभूती मिळते …. म्हणून मग रडणं चांगलच असणार… त्यामुळे तसा प्रसंग पुढे माझ्या आयुष्यात घडला कि मग 'मी' पण रडणार … अरे, पण मला खरच रडावसं वाटतंय का ? याच्या अगदी उलट… मी 'पुरूष' आणि पुरूष कधी रडत नसतात ! म्हणून मग मला कितीही रडावसं वाटल तरी मी ते दाबूनच ठेवणार… चार लोक हसतात म्हणून मीही हसणार… पण मला खरच हसू येतंय का ? कुणीतरी खूप अभ्यास करून चांगला पैसेवाल घडवल… म्हणून मीही शिकणार… अभ्यास करणार…. आवड नसताना… मला सचिन तेंदुलकर व्हायचंय… मला माधुरी दीक्षित बनायचय… मला माझ्या आई सारखा गृहिणीच रहायचय… 

          एक मैत्रीण आहे माझी… जन्मतःच डावरी… हातावर फटके मारून मारून तिच्या आपसूक पुढे येणाऱ्या डाव्या हाताला मागे खेचून उजव्या हाताचा नंबर लावण्याचा आडमुठेपणा घराच्या माणसांनी केला… आणि आता परिस्थिती अशी आहे की तिच्या डाव्या हातातही धड जोर नाही आणि उजव्या हातातही !

          तो रोज नवीन फिरवतो girlfriend म्हणून मग मीही तसाच करणार… नाहीतर मित्र मला षंढ समजतील. मी पण त्यांच्या सारखाच दारू, सिगारेट ही व्यसन करणार… पण मला खरच त्यात स्वारस्य आहे का ? की बहिणीला अभ्यासात मदत करणं , आईसाठी भाजी आणून देणं  , वडिलांची बँकेची कामं  करणं या गोष्टी मला मनापासून आवडतात ? किंवा अशीही परिस्थिति… घरच्यांचं सगळ मी मुकाट्याने ऐकते, करते… पण मनाची मात्र कुतरओढच होते… 

          मला पण त्याच्यासारखी मोठी गाडी घ्यायची आहे… माझा boyfriend तिच्या boyfriend सारखा tall, dark, handsome च असला पहिजे. मला माझ्या मुलाला त्याच्या मुलासारखा गायकच बनवायचं किंवा माझ्या गायक होऊ पाहणाऱ्या मुलाला मला scientist बनवायचं !

          याच्या-त्याच्या सारखं असण्यातच आपल्याला अभिमान ! 'मी' 'माझ्यासारख' असणं गैर आहे का ?

          'मी' कसं  वागायचं याचे मापदंड माझ्या सभोवतालच्या व्यक्ती ठरवणार ! आणि त्यांनी आखलेले मापदंड पूर्ण करण्यासाठी मी कंबर कसणार !

          भला उसकी साडी मेरे साडीसे सफेद कैसे ?

          काय हो… लहानपणापासून मनात ठसवलेल्या देवाच्या प्रतिमेमध्ये तुम्हाला खरच तुमचा देव सापडलाय का ? कि चारचौघ करतात म्हणून तुम्हीही खोटी श्रद्धा बाळगून नतमस्तक होताय?

          दुसर्याच्या भूमिकेमध्ये कळत नकळत आपण शिरतो आणि त्यांची भूमिका जगायला लागतो! माझी भूमिका इतरांपेक्षा वेगळी असू शकते ना पण ! अर्थात वेगळीच असावी हा अट्टाहास करणंही त्रासदायकच ! सर्वसामान्यपणे जगण्यात सुद्धा आनंद असू शकतो ना ! पिझ्झा खाऊन पोट भरत तसं  वरण भात खाऊन सुद्धा भरतच ना ! कॉफी … मग ती कोणत्याही आकाराच्या, रंगाच्या , नक्षीच्या कपात असली तरी ती कॉफी सारखीच लागणार ना ! आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा कश्या येतील ? एखाद्याच्या एखाद्या गोष्टीतलं श्रेष्ठत्व मलापण हवय…. पण नेमक त्याच गोष्टीतला श्रेष्ठत्व तुझ्याकडे आहे का ? त्याच्यामागे लागलो तर माझ्याकडे असणाऱ्या 'माझ्या' गोष्टींवर दुर्लक्ष करून 'मी' 'माझ्यावर' अन्याय करतोय असं नाही का होणार ? 

          माझी भूमिका मला खुलवायची आहे. माझ्यातलं कसब मला शोधायचं आहे. 'मी' 'दुबळी' आहे तर 'हो, मी दुबळी आहे!' हे मला स्वीकारता आलंच पहिजे. स्वीकारलं की मग त्यात बदल करणं साध्य होतं . तसंच 'मी' 'राजा' आहे तर 'हो, मी राजा आहे!' हेही स्वीकारता आलं पहिजे. त्यानुसार भूमिका साकाराली पाहीजे ! भूमिकांची गल्लत करून कसं चालेल ? मी शोधायचा प्रयत्न केलाय का कधी 'माझ्या भूमिकेचे कंगोरे'? माझ्यातले गुण स्वीकारले तसे माझ्यातले दोष स्वीकारले का? destination एकच… मात्र तिथे पोहोचण्याचे मार्ग हे प्रत्येकासाठी भिन्न असू शकतात न ! मग माझी वाट सोडून दुसर्याच्या वाटेने जाण्याचा अट्टाहास का ? इतरांची वाट… मग ती फुलांनी लगडलेली असो किंवा काट्यांनी भरलेली… हो, फुलांच आकर्षण असत तसंच काट्यांचही असतच ! हे आकर्षणाच कशासाठी ? माझ्या वाटेत फुलं आली तर ती उधळायची आणि काटे आले तर तेही स्विकारायचे… काहीही जरी असलं तरी ते 'माझं' असेल… फुलांना काटे आणि काट्यांना फुल बनवण्याचा अट्टहास नकोच ना ! काट्यांना फुल समजून स्वीकारण्याचा पोरखेळ सुद्धा नकोच ! काट्यांना काटे म्हणूनच आपलंस करा ना राव ! म्हणजे मग आदर राहील प्रत्येकाच्याच  अस्तित्वाचा !!! 

Tuesday, May 15, 2012

'ओढ'


              सूर्य उगवला तोच मुळी स्वच्छ सूर्यप्रकाश घेउन. सकाळी उठल्यापासूनच तो अगदी खुशीत... तरल.... किंबहुना गेल्या काही दिवसांपासूनच... पिसासारखं हलकं हलकं जणू... जणू तरंगतो आहोत हवेत... सगळं जग कवेत घ्यायचंय ... सभोवताली दिसणारी घनदाट झाडी तर सोडाच... त्या उंचच उंच झाडांमधून मध्येच डोकावाणारं आभाळ... सोनेरी किरणांची उधळण करणारा सूर्य... शरीराला आणि मनाला अलगद स्पर्शुन जाणारी मंद हवा... विशेष म्हणजे... तो काही अंतरावर असणारा नदीच्या पाण्याचा स्रोत... ज्याने त्याला एक अनुभूति प्रदान केली होती... तेजाच एक निराळ वलय देऊ केलं होतं... सगळं सगळं त्याला मुठीत हवं होतं स्वतः च्या .... एवढच काय... काल रात्री तर हट्टच धरला त्याने... ते दुरवर दिसणारे, त्याला वेडावून दाखवणारे तारे त्याला हवेत ! कारणही तसंच घडलं होतं.... 
            काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच तो पाणी पिण्यासाठी नेहमीप्रमाणे जवळच्या तलावावर न जाता दूरवरच्या खळाळणारया नदीवर गेला होता....  नदीमधल्या पाण्यात त्याने रूप पाहिलं होतं स्वतःच... काहिसं अस्थिर... पण तरीही स्वच्छ. तलावातल्या पाण्यात इतकं स्वच्छ रूप कधी दिसलंच नव्हतं! अर्थात जे दिसतंय ते त्याचंच रूप याची जाणीव त्याच्या भोवतालच्यानीच करून दिली होती म्हणा त्याला ! इतके दिवस लक्षातच आलं नव्हतं... समज तरी कुठे होती... लहान होता ना तो... बालिश !  तहान भागेपर्यंत पाणी प्यायचं आणि निघून जायचं एवढंच माहित त्याला... पण आज तो टक लावून पाहत बसला होता स्वतःच्या रुपाकडे ! आपल्याला इतरांसारखी मोहक नक्षीदार शिंग नाहीत याची जाणीव पुन्हा चटका लावून  गेली... नव्याने... मीसुध्दा या जंगलाचाच एक भाग... मोठ्या कळपातला एक छोटा भाग बनून रहावं असं खुप वाटायचं त्याला. का स्वतःला अधोरेखित करायचं? विरून जावं ना आसमंतात ! पण त्याच्यासराखे दिसणारे सगळेच एकटे... दुकटे ... किंवा फारतर तिकटे ! आणि हा जो काही गंध असतो ना माझ्याभोवती सतत... खरंतर तो वेड लावतो मला !!! पण काहीजण  त्यामुळेच दूर जातात का माझ्यापासून ? कुजबुजतात माझ्याकडे बघून... टाळतात कधीकधी... आणि काहीजण इतके घुटमळतात आजुबाजुला की पळून जावं वाटतं त्यांच्यापासून लांब ...  माझं वेगळं रूप हेसुध्दा एक कारण असावं का त्यामागे? ही असली प्रश्नांची जंत्री तयार झाली होती त्याच्या मनात पाण्यात आपलं प्रतिबिम्ब बघून ! अचानक कसलीतरी हुरहुर वाटायला लागली होती. भेदरला तो ! पळत सुटला त्या नदीपासून लांब. मनच लागेना कित्येक दिवस त्याचं कुठेच. जवळच्यांनी हटकलं  ... खटकलं... पण उपयोग शुन्य. पुन्हा पुन्हा नदीवर जायचा तो. काहिही झालं तरी या गंधाचा शोध लावायचाच या ध्यासाने. 
        असंच एके दिवशी नदीच्या काठावर गंधाच्या धुंदीत हरवलेला असताना त्याला गोष्ट आठवली... राजहंसाची ... तोही असाच... सगळ्यांपेक्षा वेगळा... पण तो तर 'राजहंस' होता ! मग 'मी' कोण? म्हणजे मलासुध्दा त्या राजहंसासारखी वेगळी ओळख असणार तर !  कळपामध्ये राहून सुध्दा मला वेगळी ओळख असणार ! हो... बरोबर ! असणारच !  मग मी का घाबरावं ? काहीतरी गवसल्यासारखं वाटलं त्याला. हसू आलं त्याला त्याच्याच इतके दिवसांच्या वेडेपणावर... त्या दिवसापासून या दिवसापर्यंत धुंदीत जगत होता तो कोणत्यातरी !  नक्की काय ते समजत नव्हतं... पण काहितरी होतं... 'वेगळं' !!! एकच ध्यास घेतला होता ... स्वतःची ओळख शोधण्याचा ! सगळ्यांसारखाच मीही जगलो तर माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय? गरुडाचे पंख मिळालेले असताना सरपटण्यात मजा ती कसली ! 
         आज मात्र ही वेगळी वाट कसली दिसतीये ???  निरखून पाहिलं त्याने तर काहितरी चमकत होतं दुरवर. भुरळ पडली त्याला बहुतेक ! तिकडे सापडेल मला माझी ओळख ! सगळ्यांची नजर चुकवून त्या वाटेला लागला तो. ते जे काही चमकणारं होतं ना ते हवं होतं त्याला. स्वतःच्या गंधाइतकंच वेड लावलं त्याला त्या अद्भुत गोष्टीने ! झालं ! तिथे लागेल मला माझ्या गंधाचा पत्ता ! पावलं चालायला लागली त्याची त्या वाटेवरून कुणीतरी खुणावत असल्यासारखी... आपसूकच... चालता चालता त्याच्या लक्षातही आलं नाही की कधी ते हिरवागार, घनदाट, सुखावणारं अरण्य संपलं आणि काटेरी, बोचरं रान सुरु झालं. नंतर तर वैराण वाळवांट... लक्षात आलं तेव्हा तो थबकलाय... हबकालय ... असं कसं काय होतंय हे? इतका काळ गेला आपण चालतोय ! प्रचंड दिवस आणि अगणित रात्रीही गेल्या बहुतेक ! किती ते आठवत नाही ... लक्षात नाही ... लक्ष दिलंच नाही ना तिकडे ! कारण चमकणारं जे होतं ते चमकतच होतं रात्रंदिवस ! नजर खिळवून ठेवली होती त्या गोष्टीने ! शरीरावर ताबा राहिलाच नव्हता कसलाच ! मनाला एकच ध्यास ... 'मला ते हवं!'... पण मी जितका पुढे आलोय तितकाच ते अजून लांब गेलंय... आणि सभोवतालचा गंध मात्र वाढतंच चाललाय ... 
             असं होऊन कसं चालेल ? मिळवायला तर हवंच ते... माझ्या वेगळेपणाची खुण नाही का ती? नाही... मला आणखी जोरात चालायला हवं ... पावलं झपाझप पडू लागलीएत त्याची. अस्वस्थपणा वाढायला लागलाय. कुठेतरी खोलवर आत काहितरी दुखायला लागलंय... शरीर तर केव्हाच थकलंय. पण त्याची पर्वा आता नाही. चटके बसायला लागलेत. झळा असह्य व्हायला लागल्यात . पोळतोय तो... होरपळतोय ... पण आता थांबायचं नाही. थांबून करणार तरी काय? आजूबाजूला सगळंच भयाण, भकास !!! शरीराचा त्रास ठीक एकवेळ ... पण आत हि सगळी उलथापालथ कसली होतेय? ढवळून निघतंय आतमध्ये सगळं ते काय आहे? कोण पोखरतय आपल्याला आणि काय पोखरलं जातंय? आपलं 'असणं' हरवत चाललंय का? कुरतडत चाललंय का? काहितरी उसवंतय ... हि कसली अनामिक भीती वाटतीये? आणि कशाची? ती चमकणारी... आपल्याला प्रेमात पडणारी गोष्ट आता नकोशी का वाटायला लागलीये? माझ्यातून बाहेर पडणारे हे असंख्य 'मी' आहेत तरी कोण? मला 'माझी' ओळख हवी होती... पण मग 'मी' असं असंख्य 'मी' मध्ये विभागला का जातोय? प्रत्येक 'मी' काहितरी सांगतोय... प्रत्येक 'मी' काहितरी 'वेगळं' सांगतोय... एका 'मी' च्या बोलण्याचा दुसऱ्या 'मी' च्या बोलण्याशी अजिबातच संबंध कसा नाही??? सगळ्यांनी फेर धरलाय माझ्याभोवती ... निघालो तेव्हा एकटेच निघालो होतो आपण ! हे सगळे आले कुठून? आणि का? यांना काय अधिकार मला चहूबाजूंनी ओढण्याचा ? मी नाही फाराफाटणार यांच्या मागे... पण ज्याच्यासाठी धावतोय तो, ते लांब पळतंय त्याच्यापासून... आणि ते जितकं अधिक कक्षेपलीकडे चाललंय तितकाच हा गंध ऊरात भरून जीव घुसमटवायला लागलाय.... 
                उधाण आल्यासारख्या सगळ्या भावना एकमेकांवर आदळायला लागल्या आहेत. पण लाटेने कितीही प्रयत्न केला सागरापासून वेगळं होऊन किनाऱ्याला लागण्याचा तरी पुन्हा त्याच्यातच विरून जाते ती !!! लाटेला स्वतःच वेगळं अस्तित्व नाही... अथांग समुद्राचाच ती एक भाग ! त्याच्या मनातल्या भावना सुद्धा आता एकमेकांवर आदळून एकमेकांमध्ये मिसळल्या.... सगळ्यांची मिळून एक भावना निर्माण झालीये... सशक्त... 'मी' पर्यंत पोहोचण्याची... एक क्षण काय झालं त्यालाही समजेना !  पण पावलं थांबलीएत त्याची ! शिंग नसण्याचं दुःख बाळगणारा मीच ! चंद्राला कवेत घेण्याचं स्वप्न पाहणारही मीच ! माझ्याच भोवतालच्या गंधाने भारावून वेडापिसा होणाराही मीच ! दूरवरच्या त्या अनामिक लोभस गोष्टीने आकर्षित होणाराही मीच ! तो थांबलाय त्याच क्षणी ती अद्भुत, मोहक गोष्टही थांबलीये ! माझ्या भोवतालच्या गंधाचा स्रोत 'तिथे' कसा असेल? सगळे 'मी' विरून चाललेत हळूहळू... शिवण घातली जातेय... विजेचा संचार व्हायला लागलाय शरीरात आणि मनात... गंध स्वछंदपणे सळसळतोय शरीरात... नाही... मी जे तिकडे शोधतोय ते तिकडे नाही इकडे आहे... माझ्यापाशी ... माझ्याचापाशी !!! शांत वाटतंय आता .... त्याच्यामागे धावलो नसतो तर? हे सापडलं असतं? वेगळ्या वाटेला न लागता तलावातच डुंबत राहिलो असतो तर पत्ता सापडला असता 'माझा?' वैराण वाळवांटात उभ्या असलेल्या त्याच्या शरीरावर शिंतोडे पडायला लागलेत पाण्याचे !!! नजर उचलली गेलीये त्याची आभाळाच्या दिशेने... शिन्तोड्यांचा वर्षाव सुरु झालाय.... अवघा आसमंत त्या गारव्याने न्हाउन निघालाय... अप्राप्य असं ते स्वप्नही हाताशी आलंय आता !!! फेर धरलाय आपसूक त्याने स्वतः भोवती.... 'मी' फेर धरलाय 'माझ्या' भोवती ! त्याला 'तो' सापडलाय ! त्याला 'मी' सापडलाय !!!            

~ तनुजा 

Sunday, April 29, 2012

द्वंद्व

Schizoprenia ...
Quadriplegia ...

पूर्णपणे मानसिक अपंगत्व ...
पूर्णपणे शारीरिक अपंगत्व ...

The most Ridiculous Superstition ...
"We Think That We Live!"

एक - आपण शरीराने जे जगतो ते जग !
दुसरं - आपण मनाने जे जगतो ते जग !

शरीराने जगत असलेल्या जगात आपण मनाने असतोच असं नाही !
मनाने जगत असलेल्या जगात आपलं शरीर असतंच असं नाही !

कधीकधी आपण दोन्हीतही नसतो ...
'ही' 'मी' नाही असं वाटावं इतके !
'मी' 'ही' नाही असं वाटावं इतके !

ती होती - मनातल्या जगात शरीराने !
तो होता - शरीरातल्या जगात मनाने !

What is more painful ?
Nothing ...
I Guess ...

तिच्या शरीराने accept केलं होतं मनाचं जग !
त्याच्या मनाने accept केलं होतं शरीराचं जग ! 

दोघेही सुखी ...
दोघेही समाधानी ...

सुखी नव्हती, समाधानी नव्हती ...
तिच्या आजूबाजूची तिची आपली माणस ...
त्याच्या आजूबाजूची त्याची आपली माणस ...

आपण कुठे, कधी आणि किती असायचं किंवा नसायचं यावर नक्के अधिकार कोणाचा ?
आपलं स्वतःचा की आपल्या आजूबाजूच्या माणसांचा की परिस्थितीचा ?

असणं आणि नसणं यात नक्की किती फरक ?
A Thread Thin Line ...

तिने कधीपर्यंत मनातल्या जगात जगत राहायचं जे मन तिला साथ द्यायला तयार नाही ?
त्याने कधीपर्यंत शरीरातल्या जगात जगत राहायचं जे शरीर त्याला साथ द्यायला तयार नाही ?

तिला जगायचंय ...
त्याला मरायचंय ...

तिने पण मरावं का ?
की त्याने जगत राहावं तसंच ?

- तनुजा 


अल्पविराम


कविता जमलीच नव्हती बघ मला कधी तू येईपर्यंत !
तुझ्यासारखं शब्दांवर आरूढ होणं माहीतच नव्हतं !!!
शब्द खेळायचे मात्र माझ्याशी...
बऱ्याचदा लपंडावच...
विरामचिन्हं  तर वाकुल्याच दाखवायची लांबूनच !
हाताशी येतंच नसत शिंची !
कधी, कुठे आणि कसं व्यक्त व्हायचं ते जमायचंच नाही त्यांना ...
तू भेटलास ...
तसा फेरच धरला त्या सगळ्यांनी माझ्याभोवती ...
गुंफत चालले सगळे एकात एक...
रूप आलं हाताशी आलेल्या प्रत्येक  चिन्हाला... अक्षराला...
प्रत्येक रुपाला आकार मात्र तुझाच...
अं... हं... सगळ्या रुपाला व्यापून उरणारा तू...
मग मात्र आम्ही खेळ बदलले...
हातात हात धरून दुडूदुडू धावायालो लागलो आम्ही...
पक्षांचा किलबिलाट  ऐकायला लागलो...
गायला लागलो...
पावसात भिजायला लागलो...
हैदोस नुसता !!!
एका मोठं आडदांड प्रश्नचिन्हं  उभं ठाकलं समोर अचानक एकदा...
तुझ्या  असण्यावर निर्माण झालेलं.... कि तुझ्या जाण्यामुळे उठलेलं...
केविलवाणे झाले माझे सगळे शब्द...
बावरली माझी सगळी विरामचिन्हं ...
सैरावरा पळत सुटली...
धडपडायला लागली...
मोठ्या प्रयत्नाने मी माझ्या कवितेला सावरलंय...
फेर नाही... पण सगळ्यांना एका ओळीत दाटीवाटीने उभं केलंय...
तुझ्या नावाचा पूर्णविराम नाही सापडत आहे....
म्हणून मग एका अल्पविरामाला जागा दिलीये सगळ्यात शेवटी !
तू येशील ना ?
आपले शब्द घेऊन...
आपलं वाक्य पूर्ण करायला?
रात्री दचकून उठणाऱ्या लहान लहान प्रश्नचिन्हांना  थोपटवून निजवायला...
आपल्या दोघांच्या नावाचा पूर्णविराम द्यायला ???
- तनुजा