कविता जमलीच नव्हती बघ मला कधी तू येईपर्यंत !
तुझ्यासारखं शब्दांवर आरूढ होणं माहीतच नव्हतं !!!
शब्द खेळायचे मात्र माझ्याशी...
बऱ्याचदा लपंडावच...
विरामचिन्हं तर वाकुल्याच दाखवायची लांबूनच !
हाताशी येतंच नसत शिंची !
कधी, कुठे आणि कसं व्यक्त व्हायचं ते जमायचंच नाही त्यांना ...
तू भेटलास ...
तसा फेरच धरला त्या सगळ्यांनी माझ्याभोवती ...
गुंफत चालले सगळे एकात एक...
रूप आलं हाताशी आलेल्या प्रत्येक चिन्हाला... अक्षराला...
प्रत्येक रुपाला आकार मात्र तुझाच...
अं... हं... सगळ्या रुपाला व्यापून उरणारा तू...
मग मात्र आम्ही खेळ बदलले...
हातात हात धरून दुडूदुडू धावायालो लागलो आम्ही...
पक्षांचा किलबिलाट ऐकायला लागलो...
गायला लागलो...
पावसात भिजायला लागलो...
हैदोस नुसता !!!
एका मोठं आडदांड प्रश्नचिन्हं उभं ठाकलं समोर अचानक एकदा...
तुझ्या असण्यावर निर्माण झालेलं.... कि तुझ्या जाण्यामुळे उठलेलं...
केविलवाणे झाले माझे सगळे शब्द...
बावरली माझी सगळी विरामचिन्हं ...
सैरावरा पळत सुटली...
धडपडायला लागली...
मोठ्या प्रयत्नाने मी माझ्या कवितेला सावरलंय...
फेर नाही... पण सगळ्यांना एका ओळीत दाटीवाटीने उभं केलंय...
तुझ्या नावाचा पूर्णविराम नाही सापडत आहे....
म्हणून मग एका अल्पविरामाला जागा दिलीये सगळ्यात शेवटी !
तू येशील ना ?
आपले शब्द घेऊन...
आपलं वाक्य पूर्ण करायला?
रात्री दचकून उठणाऱ्या लहान लहान प्रश्नचिन्हांना थोपटवून निजवायला...
आपल्या दोघांच्या नावाचा पूर्णविराम द्यायला ???
- तनुजा
agadi sahajpane.. pan mast lihilay...
ReplyDeletethank you Rakesh :-)
Delete