सूर्य उगवला तोच मुळी स्वच्छ सूर्यप्रकाश घेउन. सकाळी उठल्यापासूनच तो अगदी खुशीत... तरल.... किंबहुना गेल्या काही दिवसांपासूनच... पिसासारखं हलकं हलकं जणू... जणू तरंगतो आहोत हवेत... सगळं जग कवेत घ्यायचंय ... सभोवताली दिसणारी घनदाट झाडी तर सोडाच... त्या उंचच उंच झाडांमधून मध्येच डोकावाणारं आभाळ... सोनेरी किरणांची उधळण करणारा सूर्य... शरीराला आणि मनाला अलगद स्पर्शुन जाणारी मंद हवा... विशेष म्हणजे... तो काही अंतरावर असणारा नदीच्या पाण्याचा स्रोत... ज्याने त्याला एक अनुभूति प्रदान केली होती... तेजाच एक निराळ वलय देऊ केलं होतं... सगळं सगळं त्याला मुठीत हवं होतं स्वतः च्या .... एवढच काय... काल रात्री तर हट्टच धरला त्याने... ते दुरवर दिसणारे, त्याला वेडावून दाखवणारे तारे त्याला हवेत ! कारणही तसंच घडलं होतं....
काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच तो पाणी पिण्यासाठी नेहमीप्रमाणे जवळच्या तलावावर न जाता दूरवरच्या खळाळणारया नदीवर गेला होता.... नदीमधल्या पाण्यात त्याने रूप पाहिलं होतं स्वतःच... काहिसं अस्थिर... पण तरीही स्वच्छ. तलावातल्या पाण्यात इतकं स्वच्छ रूप कधी दिसलंच नव्हतं! अर्थात जे दिसतंय ते त्याचंच रूप याची जाणीव त्याच्या भोवतालच्यानीच करून दिली होती म्हणा त्याला ! इतके दिवस लक्षातच आलं नव्हतं... समज तरी कुठे होती... लहान होता ना तो... बालिश ! तहान भागेपर्यंत पाणी प्यायचं आणि निघून जायचं एवढंच माहित त्याला... पण आज तो टक लावून पाहत बसला होता स्वतःच्या रुपाकडे ! आपल्याला इतरांसारखी मोहक नक्षीदार शिंग नाहीत याची जाणीव पुन्हा चटका लावून गेली... नव्याने... मीसुध्दा या जंगलाचाच एक भाग... मोठ्या कळपातला एक छोटा भाग बनून रहावं असं खुप वाटायचं त्याला. का स्वतःला अधोरेखित करायचं? विरून जावं ना आसमंतात ! पण त्याच्यासराखे दिसणारे सगळेच एकटे... दुकटे ... किंवा फारतर तिकटे ! आणि हा जो काही गंध असतो ना माझ्याभोवती सतत... खरंतर तो वेड लावतो मला !!! पण काहीजण त्यामुळेच दूर जातात का माझ्यापासून ? कुजबुजतात माझ्याकडे बघून... टाळतात कधीकधी... आणि काहीजण इतके घुटमळतात आजुबाजुला की पळून जावं वाटतं त्यांच्यापासून लांब ... माझं वेगळं रूप हेसुध्दा एक कारण असावं का त्यामागे? ही असली प्रश्नांची जंत्री तयार झाली होती त्याच्या मनात पाण्यात आपलं प्रतिबिम्ब बघून ! अचानक कसलीतरी हुरहुर वाटायला लागली होती. भेदरला तो ! पळत सुटला त्या नदीपासून लांब. मनच लागेना कित्येक दिवस त्याचं कुठेच. जवळच्यांनी हटकलं ... खटकलं... पण उपयोग शुन्य. पुन्हा पुन्हा नदीवर जायचा तो. काहिही झालं तरी या गंधाचा शोध लावायचाच या ध्यासाने.
असंच एके दिवशी नदीच्या काठावर गंधाच्या धुंदीत हरवलेला असताना त्याला गोष्ट आठवली... राजहंसाची ... तोही असाच... सगळ्यांपेक्षा वेगळा... पण तो तर 'राजहंस' होता ! मग 'मी' कोण? म्हणजे मलासुध्दा त्या राजहंसासारखी वेगळी ओळख असणार तर ! कळपामध्ये राहून सुध्दा मला वेगळी ओळख असणार ! हो... बरोबर ! असणारच ! मग मी का घाबरावं ? काहीतरी गवसल्यासारखं वाटलं त्याला. हसू आलं त्याला त्याच्याच इतके दिवसांच्या वेडेपणावर... त्या दिवसापासून या दिवसापर्यंत धुंदीत जगत होता तो कोणत्यातरी ! नक्की काय ते समजत नव्हतं... पण काहितरी होतं... 'वेगळं' !!! एकच ध्यास घेतला होता ... स्वतःची ओळख शोधण्याचा ! सगळ्यांसारखाच मीही जगलो तर माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय? गरुडाचे पंख मिळालेले असताना सरपटण्यात मजा ती कसली !
आज मात्र ही वेगळी वाट कसली दिसतीये ??? निरखून पाहिलं त्याने तर काहितरी चमकत होतं दुरवर. भुरळ पडली त्याला बहुतेक ! तिकडे सापडेल मला माझी ओळख ! सगळ्यांची नजर चुकवून त्या वाटेला लागला तो. ते जे काही चमकणारं होतं ना ते हवं होतं त्याला. स्वतःच्या गंधाइतकंच वेड लावलं त्याला त्या अद्भुत गोष्टीने ! झालं ! तिथे लागेल मला माझ्या गंधाचा पत्ता ! पावलं चालायला लागली त्याची त्या वाटेवरून कुणीतरी खुणावत असल्यासारखी... आपसूकच... चालता चालता त्याच्या लक्षातही आलं नाही की कधी ते हिरवागार, घनदाट, सुखावणारं अरण्य संपलं आणि काटेरी, बोचरं रान सुरु झालं. नंतर तर वैराण वाळवांट... लक्षात आलं तेव्हा तो थबकलाय... हबकालय ... असं कसं काय होतंय हे? इतका काळ गेला आपण चालतोय ! प्रचंड दिवस आणि अगणित रात्रीही गेल्या बहुतेक ! किती ते आठवत नाही ... लक्षात नाही ... लक्ष दिलंच नाही ना तिकडे ! कारण चमकणारं जे होतं ते चमकतच होतं रात्रंदिवस ! नजर खिळवून ठेवली होती त्या गोष्टीने ! शरीरावर ताबा राहिलाच नव्हता कसलाच ! मनाला एकच ध्यास ... 'मला ते हवं!'... पण मी जितका पुढे आलोय तितकाच ते अजून लांब गेलंय... आणि सभोवतालचा गंध मात्र वाढतंच चाललाय ...
असं होऊन कसं चालेल ? मिळवायला तर हवंच ते... माझ्या वेगळेपणाची खुण नाही का ती? नाही... मला आणखी जोरात चालायला हवं ... पावलं झपाझप पडू लागलीएत त्याची. अस्वस्थपणा वाढायला लागलाय. कुठेतरी खोलवर आत काहितरी दुखायला लागलंय... शरीर तर केव्हाच थकलंय. पण त्याची पर्वा आता नाही. चटके बसायला लागलेत. झळा असह्य व्हायला लागल्यात . पोळतोय तो... होरपळतोय ... पण आता थांबायचं नाही. थांबून करणार तरी काय? आजूबाजूला सगळंच भयाण, भकास !!! शरीराचा त्रास ठीक एकवेळ ... पण आत हि सगळी उलथापालथ कसली होतेय? ढवळून निघतंय आतमध्ये सगळं ते काय आहे? कोण पोखरतय आपल्याला आणि काय पोखरलं जातंय? आपलं 'असणं' हरवत चाललंय का? कुरतडत चाललंय का? काहितरी उसवंतय ... हि कसली अनामिक भीती वाटतीये? आणि कशाची? ती चमकणारी... आपल्याला प्रेमात पडणारी गोष्ट आता नकोशी का वाटायला लागलीये? माझ्यातून बाहेर पडणारे हे असंख्य 'मी' आहेत तरी कोण? मला 'माझी' ओळख हवी होती... पण मग 'मी' असं असंख्य 'मी' मध्ये विभागला का जातोय? प्रत्येक 'मी' काहितरी सांगतोय... प्रत्येक 'मी' काहितरी 'वेगळं' सांगतोय... एका 'मी' च्या बोलण्याचा दुसऱ्या 'मी' च्या बोलण्याशी अजिबातच संबंध कसा नाही??? सगळ्यांनी फेर धरलाय माझ्याभोवती ... निघालो तेव्हा एकटेच निघालो होतो आपण ! हे सगळे आले कुठून? आणि का? यांना काय अधिकार मला चहूबाजूंनी ओढण्याचा ? मी नाही फाराफाटणार यांच्या मागे... पण ज्याच्यासाठी धावतोय तो, ते लांब पळतंय त्याच्यापासून... आणि ते जितकं अधिक कक्षेपलीकडे चाललंय तितकाच हा गंध ऊरात भरून जीव घुसमटवायला लागलाय....
उधाण आल्यासारख्या सगळ्या भावना एकमेकांवर आदळायला लागल्या आहेत. पण लाटेने कितीही प्रयत्न केला सागरापासून वेगळं होऊन किनाऱ्याला लागण्याचा तरी पुन्हा त्याच्यातच विरून जाते ती !!! लाटेला स्वतःच वेगळं अस्तित्व नाही... अथांग समुद्राचाच ती एक भाग ! त्याच्या मनातल्या भावना सुद्धा आता एकमेकांवर आदळून एकमेकांमध्ये मिसळल्या.... सगळ्यांची मिळून एक भावना निर्माण झालीये... सशक्त... 'मी' पर्यंत पोहोचण्याची... एक क्षण काय झालं त्यालाही समजेना ! पण पावलं थांबलीएत त्याची ! शिंग नसण्याचं दुःख बाळगणारा मीच ! चंद्राला कवेत घेण्याचं स्वप्न पाहणारही मीच ! माझ्याच भोवतालच्या गंधाने भारावून वेडापिसा होणाराही मीच ! दूरवरच्या त्या अनामिक लोभस गोष्टीने आकर्षित होणाराही मीच ! तो थांबलाय त्याच क्षणी ती अद्भुत, मोहक गोष्टही थांबलीये ! माझ्या भोवतालच्या गंधाचा स्रोत 'तिथे' कसा असेल? सगळे 'मी' विरून चाललेत हळूहळू... शिवण घातली जातेय... विजेचा संचार व्हायला लागलाय शरीरात आणि मनात... गंध स्वछंदपणे सळसळतोय शरीरात... नाही... मी जे तिकडे शोधतोय ते तिकडे नाही इकडे आहे... माझ्यापाशी ... माझ्याचापाशी !!! शांत वाटतंय आता .... त्याच्यामागे धावलो नसतो तर? हे सापडलं असतं? वेगळ्या वाटेला न लागता तलावातच डुंबत राहिलो असतो तर पत्ता सापडला असता 'माझा?' वैराण वाळवांटात उभ्या असलेल्या त्याच्या शरीरावर शिंतोडे पडायला लागलेत पाण्याचे !!! नजर उचलली गेलीये त्याची आभाळाच्या दिशेने... शिन्तोड्यांचा वर्षाव सुरु झालाय.... अवघा आसमंत त्या गारव्याने न्हाउन निघालाय... अप्राप्य असं ते स्वप्नही हाताशी आलंय आता !!! फेर धरलाय आपसूक त्याने स्वतः भोवती.... 'मी' फेर धरलाय 'माझ्या' भोवती ! त्याला 'तो' सापडलाय ! त्याला 'मी' सापडलाय !!!
~ तनुजा
kya baat kya baat kya baat....
ReplyDelete